लोणीकंद येथील श्री म्हसोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद (ता. हवेली) : गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाचा सालाबादप्रमाणे होणारा यात्रा उत्सव यंदा चैत्र शुद्ध सप्तमी निमित्त दि. २५ मार्च ते २७ मार्च दरम्यान अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या यात्रेत धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. २५) पहाटेच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. सकाळी श्रींची महापूजा व अभिषेक विधी पार पडला. त्यानंतर दिवसभर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.दिवसभर रंगलेल्या या शर्यतींनी प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले. एकूण १३० बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. गावाच्या वतीने प्रत्येक सहभागी बैलगाडीला ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय सलग तिसऱ्या वर्षी सहभागी झालेल्या तीस बैलगाड्यांपैकी विजेत्यांना एकूण ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आली. रात्री श्रींची पालखी मिरवणूक मोठ्या भक्तीभावात आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली.

दुसऱ्या दिवशी (दि. २६) रामनवमी निमित्त धार्मिक कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. ह.भ.प. शैलेश महाराज वाळुंज यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले. सायंकाळी आयोजित कुस्ती स्पर्धेत नामांकित पैलवानांनी दमदार झुंजी देत प्रेक्षकांची मने जिंकली. रात्री सुप्रसिद्ध कलाकार मंगला बनसोडे व नितीनकुमार बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशाने उपस्थितांना खळखळून हसवले आणि मनोरंजनाची मेजवानी दिली.

उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (दि. २७) रात्री ‘३६ नखरेवाली’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद लुटला.या संपूर्ण उत्सवाचे नियोजन समस्त ग्रामस्थ लोणीकंद यांच्या वतीने करण्यात आले होते. ग्रामस्थांचे नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि भाविकांचा उत्साह यामुळे यंदाची श्री म्हसोबा देवाची यात्रा अविस्मरणीय ठरली.

|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





