लोणीकंदमध्ये स्टोन क्रेशरचा रात्री धुडगूस; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच!
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद (ता. हवेली) : गावातील स्टोन क्रेशर चालकांनी अक्षरशः दंडेलशाही माजवली असून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे क्रेशर सुरू ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या नियमांचे पालन केल्याचे भासवणारे हे क्रेशर चालक रात्री मात्र मनमानी कारभार करत असल्याने धूळ प्रदूषणात दुप्पट वाढ होत आहे.
गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना श्वसनाचे आजार जडत आहेत. तरीही संबंधित महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच रात्री क्रेशर सुरू ठेवण्यासाठी कोणाची मूकसंमती मिळत असल्याचा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, काही ग्रामस्थांनी रात्री सुरू असलेला क्रेशर बंद करण्यासाठी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, क्रेशर मालकाने उलट त्यांनाच दमदाटी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. “मी क्रेशर चालवणारच, कोणाला काय करायचे ते करून घ्या,” असा उर्मट इशारा एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
धूळ प्रदूषणामुळे लोणीकंद परिसरातील जनतेचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. “क्रेशर चालकांची ही मनमानी कधी थांबणार?”, “महसूल विभाग झोपेत आहे का?”, “पैशाच्या जोरावर गावकऱ्यांचे आरोग्य वेशीला टांगले आहे का?” असे संतप्त प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
आता तरी संबंधित प्रशासन जागे होऊन या बेकायदेशीर प्रकारावर कारवाई करणार का, की नागरिकांचा जीव धोक्यात टाकणारा हा खेळ असाच सुरू राहणार? असा सवाल संपूर्ण लोणीकंद परिसरातून विचारला जात आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





