मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ हा केवळ रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक दर्जाचा नमुना आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला तब्बल ७० हजार कोटी रुपयांची गती मिळणार आहे. हा प्रकल्प ‘मिसिंग लिंक’ पेक्षा ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणून ओळखला जावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिशय कठीण भौगोलिक परिस्थिती, दऱ्याखोऱ्या आणि जंगल परिसरात यंत्रसामुग्री पोहोचवून हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीत सात देशांतील तज्ज्ञ संस्था आणि कंपन्यांचे मोलाचे योगदान लाभले. कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कामगारांचे तसेच एमएसआरडीसीच्या संपूर्ण चमूचे विशेष कौतुक केले.
या ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डिकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, एमएसआरडीसीचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी तसेच प्रकल्पात सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील हा ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्प राज्याच्या पायाभूत विकासातील ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, भविष्यातील वाहतूक, उद्योग आणि गुंतवणुकीसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





