वाघोलीतील नामांकित ज्वेलरी दुकानाच्या प्रखर एलईडी जाहिरात फलकामुळे अपघाताचा धोका; कारवाईची माहिती सेवा समितीची मागणी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वाघोली : पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाघोलीतील एका नामांकित ज्वेलरी दुकानाने रस्त्यालगत अत्यंत प्रखर प्रकाशाचा एलईडी जाहिरात फलक लावल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या फलकातून येणारा तीव्र प्रकाश थेट वाहनचालकांच्या डोळ्यांवर पडत असल्याने क्षणभर दृष्टी दिपते आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची चिंता माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी व्यक्त केली आहे.
वारघडे यांनी सांगितले की, संबंधित एलईडी फलकाचा प्रकाश इतका तीव्र आहे की, समोरून येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील परिस्थिती स्पष्ट दिसत नाही. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास होत आहे. अशा प्रकारच्या प्रखर प्रकाशामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊन अपघाताचा धोका वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभाग आणि पुणे महापालिकेने तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी, संबंधित ज्वेलरी व्यावसायिकाला नियमांचे पालन करण्याबाबत सूचना द्याव्यात तसेच आवश्यक असल्यास नोटीस बजावून एलईडी फलकाची प्रकाशतीव्रता कमी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केली आहे.
रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रखर प्रकाशाच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





