भर पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनमन राहुल चव्हाण यांची धाडसी कामगिरी; वाजेवाडी ग्रामस्थांकडून आभार
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वाजेवाडी : मुसळधार पावसामुळे भीमा नदीला आलेल्या महापुराचा फटका शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावालाही बसला. पुराच्या पाण्यात वीजवाहिन्या बुडाल्याने गावाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. अंधाराचे संकट ओढवलेल्या गावात महावितरणचे कर्तव्यदक्ष लाईनमन राहुल चव्हाण यांनी अत्यंत धाडस आणि तत्परता दाखवत पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करून दिल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.
सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीने धोक्याची पातळी गाठली होती. नदीकाठच्या परिसरात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्या पाण्याखाली गेल्या आणि वाजेवाडी गावाचा वीजपुरवठा बंद झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही लाईनमन राहुल चव्हाण यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भर पावसात घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मुख्य वीजवाहिन्या सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून दुसऱ्या बाजूने पर्यायी जोडणी करत वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यांच्या या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे गावातील नागरिकांना अंधारातून मुक्ती मिळाली तसेच दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत होण्यास मदत झाली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल वाजेवाडी ग्रामस्थांनी महावितरणचे लाईनमन राहुल चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले. संकटकाळात जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांमुळे महावितरणबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





