माऊलींच्या पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात आळंदीत उत्साहात स्वागत
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी (गौतम पाटोळे) : आषाढी पायी वारी सोहळ्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि. ८) हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात अलंकापुरी आळंदीत आगमन झाले. पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन व गोपाळपूर येथील काला सोहळा पूर्ण करून माऊलींच्या पादुका आळंदीत परतताच शहरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.
पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर व ऋषिकेश आरफळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊलींच्या पादुका परंपरेनुसार आळंदी देवस्थानकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून विना मंडपातून माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात आरती करण्यात आली.
माऊलींच्या पालखीचे आळंदीत आगमन होत असताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या, पुष्पसजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माऊली भक्त मंडळांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. विविध ठिकाणी वारकरी व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आळंदीतील प्रथा-परंपरेनुसार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या मूळपीठ येथे ह.भ.प. अवधूत महाराज चक्रांकित व परिवाराच्या वतीने पिठलं-भाकरीचा महाप्रसाद देण्यात आला. तसेच माऊली अन्नछत्र मंडळाच्या वतीने भिठलं-भाकरी, शिरा व मसाला भाताचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. माऊलींचा पालखी सोहळा आळंदीत विसावल्यानंतर भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे प्रमुख राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे, कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, वेदमूर्ती अवधूत महाराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सुजाता तापकीर, मानकरी राहुल चिताळकर पाटील यांच्यासह पालखी सोहळ्याचे मानकरी, चोपदार, दिंडीकरी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरल्या पादुका मंदिरातही स्वागत
श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा शाल, श्रीफळ व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. भावार्थ देखणे, राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी, पुष्पसजावट आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आळंदी व दिघी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
‘स्वच्छता वारी’तून सेवाभाव
आषाढी वारीदरम्यान ‘स्वच्छतेचीही वारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. विशाल वारीमध्ये स्वच्छतेसाठी योगदान देता आल्याचे समाधान सेवकांच्या चेहऱ्यावर दिसून आले. स्वच्छता वारीत सहभागी झालेल्या सर्व सेवक व पदाधिकाऱ्यांचे दिलीप महाराज ठाकरे यांनी आभार मानले. आगामी काळात स्वच्छता मोहीम आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या ‘नादब्रह्म’ शिल्पाचे उद्घाटन
आळंदी नगरपरिषदेच्या वतीनेही पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. दगडी पुलाच्या सुरुवातीला नगरपरिषदेने विकसित केलेल्या ‘नादब्रह्म’ शिल्पाचे वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत हरिनाम गजरात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, गटनेते सचिन गिलबिले यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या श्रीराम मंदिरातही माऊलींच्या पालखीचे परंपरेनुसार स्वागत व आरती करण्यात आली. यावेळी पालखीचे मालक ऋषिकेश आरफळकर, चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, योगेश सुरू, बाळासाहेब कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून तसेच पालखी सोहळ्यासोबत प्रवास करत हरिनाम गजरात माऊलींचे स्वागत केले. यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने आनंदी, उत्साही आणि मंगलमय वातावरणात वारी आळंदीत परतली. व्यवस्थापन, भोजन व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था झाल्याने सोहळा सुरळीत पार पडल्याचे उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





