व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची स्थापना
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
दिलीप साळुंके, रश्मी भदरगे, सोमनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या प्रश्नांना मिळणार नवी धार
परभणी : पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीला नवी दिशा दिली आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधून परभणी येथे आयोजित बैठकीत नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १४ सदस्यीय महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली.
व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील पदाधिकारी व सदस्यांमधून स्वयंस्फूर्तीने या कोअर कमिटीची निवड करण्यात आली. राज्यातील पत्रकारांचे प्रश्न, संघटनेचे राज्यव्यापी कामकाज, जिल्हा व विभागीय पदाधिकाऱ्यांमधील समन्वय तसेच पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रभावी भूमिका घेण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या कमिटीवर सोपविण्यात आली आहे.
कोअर कमिटीच्या नेतृत्वाची जबाबदारी नाशिकचे दिलीप साळुंके, परभणीच्या रश्मी भदरगे आणि सोलापूरचे सोमनाथ पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांत सक्रियपणे कार्यरत असलेल्या अनुभवी पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याने संघटनेच्या आगामी वाटचालीला अधिक संघटित स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
१४ सदस्यीय कोअर कमिटी
महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीमध्ये सोमनाथ पवार (सोलापूर), रश्मी भदरगे (सेलू), दिलीप साळुंके (नाशिक), नागेश कल्याण (नांदेड), गिरीश देशमुख (वसमत), संजय बरदापुरे (हिंगोली), जय भोसले (सिंधुदुर्ग), रुपेश जाधव (नंदुरबार), गौतम वाघमारे (कल्याण), इरशाद शेख (पुणे), कैलास निधोट (लातूर), सुहास वेताळ (अहिल्यानगर), सय्यद सलीम (पूर्णा) आणि रियाज मुल्ला (कोंढवा) यांचा समावेश आहे.
या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ, नरेंद्र देशमुख, लोकशाही न्यूजचे संपादक विशाल पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, विभागीय व राज्य पदाधिकारी तसेच परभणी जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले, “ही कोअर टीम केवळ पदाधिकाऱ्यांची टीम नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकाराच्या प्रश्नासाठी उभा राहणारा कृतीशील समूह आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष, संघटनेची मजबूत बांधणी आणि प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांशी प्रभावी समन्वय हे या टीमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
क्रांती दिनी स्थापन झालेली ही नवी कोअर कमिटी पत्रकारांच्या संघटनात्मक लढ्याला नवी ऊर्जा देणारी ठरणार असून, पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी ठोस भूमिका घेण्याबरोबरच राज्यभरातील पत्रकारांना अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आव्हान या टीमसमोर असणार आहे. त्यामुळे व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील पुढील वाटचालीत या १४ सदस्यीय कोअर कमिटीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





