आशा सेविकांचा सन्मान; व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
कोरेगाव भीमा : मनोब्रम्हा फाउंडेशन व संवाद पुनर्वसन केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात परिसरातील आशा सेविकांना व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य तसेच व्यसनाधीन व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य समुपदेशन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बुधवार (दि. १२) रोजी संवाद पुनर्वसन केंद्रात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
डॉ. किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशा सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. किरण चव्हाण यांनी व्यसनाधीन व्यक्तींशी संवाद साधताना घ्यावयाची काळजी, त्यांच्या कुटुंबीयांना द्यावयाचे मार्गदर्शन आणि योग्य समुपदेशन याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यामध्ये आशा सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, गावपातळीवर व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुप्रिया चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन पायल डोळस यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन हेमंत कुमार मुळे व महादेव माने यांनी केले. केंद्रातील कर्मचारी वर्गाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
मानसिकदृष्ट्या निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. मनोब्रम्हा फाउंडेशन व संवाद पुनर्वसन केंद्राच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





