वाजेवाडीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट; विहिरीवरील पंपाची केबल लंपास
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारणाऱ्या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा..
वाजेवाडी, प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील वाजेवाडी परिसरात भुरट्या चोरट्यांनी डोके वर काढले असून, वढू पाबळ रस्त्यावरील भोरडे पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या विहिरीवरील विद्युत पंपाची सुमारे ५० फूट केबल अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. ४) सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास लंपास केली. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या या चोरट्यांमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या विद्युत पंपाची केबल चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्याचे सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरीची रक्कम किरकोळ असली तरी शेतकऱ्याच्या घामाच्या पैशाला हात घालण्याची चोरट्यांची हिंमत वाढत असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतांच्या परिसरात फिरणारे हे भुरटे चोर नेमके कोणाच्या जीवावर उठले आहेत? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. शेतात पिके उभी असताना पंपाच्या केबलसारख्या वस्तू चोरीला जाणे म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर घालण्याचा प्रकार आहे.
विशेष म्हणजे, परिसरात अशा किरकोळ चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आज केबल, उद्या मोटार आणि त्यानंतर शेतीतील महत्त्वाचे साहित्य चोरट्यांना वेळीच आवर घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, चोरी करणारे व्यक्ती परिसरातीलच असण्याची शक्यता संबंधित शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारणाऱ्या या निर्लज्ज भुरट्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना कायद्याचा धडा शिकवावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास नागरिकांनी सतर्क राहून तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





