विठ्ठल वळसे पाटील लिखित ‘निसर्ग दाता’ पुस्तकाचे प्रकाशन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पर्यावरणीय परिणामांमुळे निसर्गाबाबत पुनर्विचाराची गरज – डॉ. दत्ता देशकर
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
निसर्ग व भूगर्भातील झपाट्याने होत असलेले बदल अत्यंत धोकादायक असून त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मानवाने निसर्गाबाबत पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, संभाजीनगरचे निवृत्त प्राचार्य डॉ. दत्ता देशकर यांनी केले.
बकोरी देवराई वनराई वृक्ष प्रकल्प व सेवा समर्पण सोशल फाउंडेशन यांच्या वतीने बकोरी वनराई प्रकल्पात स्तंभलेखक विठ्ठल वळसे पाटील लिखित ‘निसर्ग दाता’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती सेवा समितीचे राज्याध्यक्ष चंद्रकांत वारघडे होते.
डॉ. देशकर पुढे म्हणाले की, नैसर्गिक स्रोतांवर मानवाकडून होत असलेला अतिरेक जलचर जीवन व जैवविविधतेच्या नाशास कारणीभूत ठरत आहे. अतिरिक्त रासायनिक घटकांच्या वापरामुळे मानवी आयुष्यमानही घटत चालले आहे. ‘निसर्ग दाता’ या वैचारिक ग्रंथात निसर्गाची विविधता आणि संवर्धनाचा आशय प्रभावीपणे मांडला असून पर्यावरण अभ्यासकांसाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल.
प्रमुख पाहुणे भोरचे विस्तार अधिकारी सचिन लोखंडे म्हणाले की, निसर्गाशिवाय जीवन अपूर्ण आहे; त्यामुळे निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाचा सहभाग मोलाचा आहे. अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी वाढता निसर्गाचा ऱ्हास पक्षी स्थलांतरास कारणीभूत ठरत असल्याचे नमूद करून देशी वृक्षरोपणाच्या माध्यमातून पशू-पक्ष्यांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संत व समाजसुधारक विचार केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे यांनी वाढत्या रासायनिक शेतीबाबत खंत व्यक्त केली.
यावेळी मातृरक्षा प्रकाशन संस्थेच्या प्रकाशिका स्वाती इंगळे, शिक्रापूरचे माजी उपसरपंच व लेखक मयूर करंजे पाटील, पत्रकार दीपक नायक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात वनराई परिसरात वृक्षरोपणाने झाली.
प्रकाशनाची पहिली प्रत ज्येष्ठ पत्रकार दिवंगत के. डी. गव्हाणे यांच्या कन्या श्वेता गव्हाणे, पुत्र अभिजीत गव्हाणे व भाऊ विनोद गव्हाणे यांना देण्यात आली. ‘निसर्ग दाता’ हा वैचारिक ग्रंथ स्व. शिवसेना नेते अॅड. अविनाश रहाणे व ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय के. डी. गव्हाणे यांना अर्पण केल्याचे लेखक विठ्ठल वळसे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले, जितेंद्र आव्हाळे,, गजानन गव्हाणे, पाठ्यपुस्तकातील कवी सचिन बेंडभर, आखिल भारतीय परिषदेचे शिरूर अध्यक्ष राहुल चातूर, प्रा. कुंडलिक कदम, गुरुनाथ पाटील, कवी आकाश भोरडे, गणेश साळुंखे, प्रभाकर मुसळे, ज्ञानेश्वर पाटेकर, नितीन शिंदे, सर्पमित्र शेरखान शेख, संभाजी गोरडे, पोपट मांजरे, सचिन धुमाळ, गणेश थोरात, संभाजी चौधरी, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, श्रीकांत वाळूंज तसेच विविध निसर्ग संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार गणेश सातव यांनी केले, तर आभार प्रदर्शन विठ्ठल वळसे पाटील यांनी मानले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





