अलंकापुरीत हरिनाम गजरात माऊलींच्या पालखी सोहळ्याची सांगता
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वार्ताहर गौतम पाटोळे
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याची आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अलंकापुरीत हरिनाम गजरात सांगता झाली. रविवारी (दि. ९) हजेरी मारुती मंदिरात पालखी सोहळ्यातील मानकरी, दिंडीप्रमुख, विणेकरी व वारकरी यांच्या उपस्थितीत अभंगसेवेने हजेरीची परंपरा पार पडली. टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संपूर्ण आळंदी भक्तिमय झाली.
आषाढी एकादशीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. श्रींच्या चांदीच्या लक्षवेधी मुखवट्याची फुलांनी सजविलेल्या पालखीतून मंदिर व नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी मंदिरात पवमान अभिषेक, दुग्धारती, नैवेद्य, पूजा, रुद्राभिषेक, फराळाचा महानेवेद्य आदी धार्मिक विधी पार पडले.
हजेरी मारुती मंदिरात पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीकऱ्यांची अभंगरूपी सेवा झाली. परंपरेनुसार कुऱ्हाडे पाटील व नाईक परिवाराच्या वतीने नारळ व प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सेवेसाठी वसंतराव कुऱ्हाडे, सुरेश कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे यांच्यासह कुऱ्हाडे परिवार व नवशिव शक्ती तरुण मंडळाने परिश्रम घेतले. हजेरीनंतर श्रींची पालखी हरिनाम गजरात पुन्हा मंदिरात दाखल झाली. मंदिर प्रदक्षिणा, आरती व मानकऱ्यांना देवस्थानतर्फे नारळ-प्रसाद वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू तापकीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळाप्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, पुजारी अमोल गांधी, राजाभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, स्वप्नील कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक यांच्यासह मानकरी, दिंडीकरी व विणेकरी उपस्थित होते..ह.भ.प. अवधूत महाराज चक्रांकित परिवाराच्या वतीने हरिपाठावर आधारित कीर्तनसेवा सादर करण्यात आली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर व ग्रामप्रदक्षिणा हरिनाम गजरात पार पडली. मंदिर प्रदक्षिणेनंतर देवस्थानतर्फे वारी सोहळ्यातील मानकऱ्यांना नारळ व प्रसाद देण्यात आला.
दर्शन व्यवस्थेवर भाविकांची नाराजी
दरम्यान, आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील काही प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आल्याने भाविक, नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. श्री गणेश दरवाजा, श्री काळा मारुती दरवाजा व पान दरवाजा बंद ठेवण्यात आल्याने भाविकांना आजोळघर गांधीवाडा परिसरातून विकसित करण्यात आलेल्या दर्शनबारीतून एकाच मार्गाने प्रवेश देण्यात आला.
यामुळे मुख्य प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी झाली. दर्शनबारी मंदिराबाहेर दूरवर गेल्याने पाऊस व उन्हाचा त्रास भाविकांना सहन करावा लागला. दर्शनबारीतील काही भाग पूर्ण क्षमतेने न भरल्यानेही नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. मंदिराच्या विविध ओवऱ्या भाविकांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या असत्या तर गर्दीचे नियोजन अधिक सुकर झाले असते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
इंद्रायणी आरतीने भक्तिमय वातावरण
आषाढी एकादशीनिमित्त इंद्रायणी नदी घाटावर आळंदी देवस्थानतर्फे इंद्रायणी आरतीचा कार्यक्रम उत्साहात झाला. इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने श्रींची आरती, इंद्रायणी आरती, पसायदान तसेच भाविकांना केळीप्रसाद वाटप करण्यात आला. संयोजक अनिताताई झुजम, अर्जुन मेदनकर यांच्यासह समितीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेवा बजावली.
लोढा परिवारातर्फे ३५ वर्षांपासून अन्नदान
‘अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान’ या संकल्पनेतून लोढा परिवारातर्फे गेल्या ३५ वर्षांपासून विविध धार्मिक पर्वांवर अन्नदानाचा उपक्रम राबविला जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त माऊली मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या हजारो भाविकांना साबुदाणा खिचडी, केळी, राजगिरा गुळदाणी, शेंगदाणा लाडू, मसाले दूध आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.
शनिवारी (दि. ८) माऊलींच्या पालखीचे अलंकापुरीत आगमन झाल्यानंतरही लोढा परिवारातर्फे हजारो वारकऱ्यांना बेसन, भाकरी, मसालेभात व शिरा असा महाप्रसाद देण्यात आला. अशोक लोढा, मनसुख लोढा, धरमचंद लोढा, दिपेश लोढा व परिवारासह स्वकाम सेवा मंडळाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.माऊलींच्या पालखी आगमनानंतर ह.भ.प. अवधूत चक्रांकित महाराज, नंदकुमार कुऱ्हाडे, अतुल लोणकर, महेश गोरे, शिवतेज मित्र मंडळ, अलंकापुरी प्रतिष्ठान तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीनेही भाविकांसाठी महाप्रसाद व अन्नदान सेवा करण्यात आली.
पोलिस प्रशासनाचे नियोजन
पालखी सोहळ्याच्या काळात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलिसांनी विशेष नियोजन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा निनाद आणि लाखो भाविकांच्या भक्तिभावात माऊलींच्या पायी वारी पालखी सोहळ्याची अलंकापुरीतील सांगता झाली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





