वढू बुद्रुक येथील ‘माहेर’ संस्था निराधारांसाठी ठरली देवदूत – डॉ. रवींद्र येळवंडे
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
डॉ. रवींद्र येळवंडे यांच्याकडून ५०० साड्या व पुरुषांना पॅन्ट-शर्टचे वाटप
वार्ताहर गौतम पाटोळे
शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील ‘माहेर’ संस्था निराधार, गरजू महिला, पुरुष व बालकांसाठी प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेचे माहेरघर ठरली असून, ही संस्था खऱ्या अर्थाने देवदूताचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते, ऑनररी डॉक्टरेट व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कारप्राप्त डॉ. रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे यांनी केले.
माहेर संस्थेतील निराधार महिलांना डॉ. रवींद्र येळवंडे यांच्या वतीने सुमारे ५०० साड्या, तसेच पुरुषांना पॅन्ट-शर्टचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
यावेळी डॉ. बाबाराजे तापकीर, मुख्याध्यापक विजय चव्हाण (प्रिझम स्कूल, चऱ्होली बुद्रुक), संस्थापक अध्यक्ष सिकंदर शेख, ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे, माहेर संस्थेचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने निराधार महिला उपस्थित होत्या.
डॉ. येळवंडे म्हणाले, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी गेल्या सुमारे तीन दशकांपासून निराधार महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच मानसिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. ‘येवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ या उक्तीप्रमाणे आज माहेर संस्थेचा मोठा वटवृक्ष झाला आहे.
माहेर संस्थेचे सामाजिक कार्य महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांत सुरू आहे. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेकडून समाजातील गरजू घटकांना आधार दिला जात आहे.
समाजातील गरजू, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींना मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. दानशूर व्यक्ती, उद्योजक, कारखानदार आणि समाजातील नागरिकांनी अशा संस्थांच्या पाठीशी उभे राहून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात देण्याचा डॉ. रवींद्र येळवंडे यांचा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा माहेर संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने डॉ. येळवंडे यांचे आभार मानत, त्यांच्या हातून यापुढेही अशीच समाजसेवा घडावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





