लोणी काळभोर येथे पाणंद रस्ते व आरोग्य समस्यांवर उद्या बैठक
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणी काळभोर : हवेली तालुका पाणंद रस्ते समिती तसेच हवेली तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आली आहे. शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही बैठका होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी थेऊर येथे झालेल्या समाधान शिबिरात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील पाणंद रस्ते, शिवरस्ते व शेतरस्त्यांबाबत प्राप्त प्रस्तावांचा बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. रस्त्यांची सद्यस्थिती, आवश्यक निधीची तरतूद तसेच प्रलंबित मागण्यांवर यावेळी चर्चा होणार आहे.
महसूल, भूमीअभिलेख, वन, कृषी, बांधकाम, पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीसह विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून रस्त्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा घेऊन पाणंद व शिवरस्त्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, हवेली तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या बैठकीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील वैद्यकीय सुविधा, औषधसाठा आणि आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. हिवताप, डेंग्यू तसेच इतर संसर्गजन्य व मौसमी आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, लसीकरण मोहिमा आणि विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवरही चर्चा होणार आहे.
ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती कार्यक्रम, विशेष आरोग्य तपासणी शिबिरे तसेच जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि ग्रामस्तरीय आरोग्य यंत्रणेमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून आरोग्य विभागाचे काम गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
या दोन्ही बैठकांमुळे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणंद रस्ते व शिवरस्त्यांच्या प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार असल्याचे हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी सांगितले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





