महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; छत्रपती संभाजीनगर येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्याची मागणी
पुणे | प्रतिनिधी :
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या.
मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा मोठा ताण निर्माण झाल्याने खरीप पिके करपू लागली आहेत. पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसमोर कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादनच हातात येण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात, खरीप नुकसानीपोटी शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा व चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
यावेळी प्रदेश प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, महानगराध्यक्ष अविनाश मोहिते, मध्य जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, जिल्हा सचिव निलेश ढगे, उपाध्यक्ष जोतिबा नरवडे आदी उपस्थित होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





