अष्टापूरमध्ये बिबट्याचा हल्ला; महिला गंभीर जखमी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील खोलशेत वस्ती परिसरात आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली. अंजना वाल्मीक कोतवाल असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांना तातडीने वाघोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दशक्रिया विधीसाठी घरातून बाहेर पडल्या असता त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून हल्ला केला. आरडाओरड ऐकताच त्यांच्यासोबत दशक्रियेसाठी निघालेल्या इतर नागरिकांनी तत्काळ धाव घेत महिलेची सुटका केली आणि तातडीने रुग्णालयात नेले.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे अष्टापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला असून, पथकाकडून परिसराची पाहणी सुरू आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिरूर–हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस केली. त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून तत्काळ व आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी प्रशांत खाडे व महादेव मोहिते यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे, तसेच परिसरात पिंजरे लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. तसेच रात्री व पहाटेच्या वेळेत नागरिकांनी विशेष सतर्क राहावे, असे आवाहनही माजी आमदार अशोक पवार यांनी केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





