वाघोलीत आईकडून मुलाची हत्या; मुलगी गंभीर जखमी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, प्रतिनिधी
वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायफ रोड परिसरातील पठाण हाइट्स येथे मंगळवारी (दि. २७) एक धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून आईने आपल्या अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जायभाय (रा. वाघोली) हे त्यांच्या पत्नी सोनी जायभाय व दोन मुलांसह अवघ्या आठ दिवसांपूर्वी सदर इमारतीत भाड्याने राहण्यास आले होते. संतोष जायभाय हे पोकलॅण्ड मशीन ऑपरेटर म्हणून काम करत असून त्यांना दारूचे व्यसन होते. यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे.
दि. २६ जानेवारी रोजी रात्री दारूच्या नशेत घरी आल्यानंतर संतोष जायभाय व त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ९ वाजता संतोष जायभाय हे भांडण करून घराबाहेर निघून गेले. काही वेळाने घरातून मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. खिडकीतून पाहिले असता, मुलगा साईराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.
या घटनेत सोनी जायभाय (वय २९) हिने आपल्या मुलगा साईराज याची हत्या केल्याचे तसेच मुलगी धनश्री हिच्यावरही हल्ला केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या धनश्रीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे हे करत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





