लोणीकंद : गतिरोधक बसविण्यासाठी सोसायटी रहिवाशांचे उपोषण..
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद प्रतिनिधी :
लोणीकंद हद्दीतील लोणीकंद–थेऊर अष्टविनायक मार्गावरील राजेश इस्ट इनिग्मा सोसायटी (सोनबा नगर) समोरील रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने गतिरोधक बसविण्यास सोसायटीतील रहिवाशांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात सोसायटीतील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून सदर ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे काम प्रत्यक्ष सुरू होत नसल्याने दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीतील राहिवासी, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश सावंत यांनी दिली.
सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून रस्ता उताराचा असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिसरात भारत पेट्रोल पंप, गॅलक्सी इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच सोमवंशी अकॅडमी असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी याच ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा गंभीर अपघात झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पुणे तसेच लोणीकंद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





