लोणीकंद मगर वस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
लोणीकंद (ता. हवेली) : मगर वस्ती येथील पंडित कोलते यांच्या शेतात काम करणाऱ्या महिला कामगार रुक्मिणाबाई सावंत यांना शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तात्काळ दखल घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

शेतामध्ये बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आल्याची माहिती डॉक्टर चैतन्य कोलते यांनी राहुल शिंदे यांना दिली. त्यानंतर राहुल शिंदे यांनी तात्काळ वनरक्षक बाळासाहेब जावडे यांना याबाबत कळविले. माहिती मिळताच वनरक्षक जावडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिसराची पाहणी केली.पहणी दरम्यान शेतातील ठसे तपासून ठसे बिबट्याचेच असल्याची खात्री झाल्याचे वनरक्षक बाळासाहेब जावडे यांनी स्पष्ट केले. परिसरात शंभर टक्के बिबट्याचा वावर असल्याचे त्यांनी सांगितले. शिकारीच्या शोधात बिबट्या या भागात येत असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांना सूचना देताना वनरक्षक जावडे म्हणाले की, संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत विशेष सतर्कता बाळगावी. लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये, तसेच लहान जनावरे बंदिस्त ठेवावीत. लवकरच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.या पाहणी वेळी लोणीकंदचे माजी उपसरपंच राहुल शिंदे, डॉक्टर चैतन्य कोलते आणि वनरक्षक बाळासाहेब जावडे उपस्थित होते. नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





