आळंदीत प्रवेश रोखल्याने अडकलेल्या वारकऱ्यांना बकोरीत मोफत निवारा; वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांचा सेवाभाव
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
बकोरी (ता. हवेली, जि. पुणे) : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होतात. यंदा मुसळधार पावसामुळे आळंदी परिसरातील इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक रस्ते व पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र शासन आणि आळंदी देवस्थान समितीने काही दिंड्यांना आळंदीत प्रवेश न करण्याचे आवाहन केले.
या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथील दिंडी क्रमांक १९६ आळंदीजवळ अडकून पडली होती. यावेळी मनोजदादा जरांगे पाटील यांचे सहकारी संजय कर्डीले यांनी वृक्षमित्र चंद्रकांत गोविंद वारघडे यांच्याशी संपर्क साधून वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची विनंती केली.
विनंती मिळताच चंद्रकांत वारघडे यांनी आपल्या गोविंद बाग निसर्गोपचार केंद्रातील प्रशस्त सभागृहात सुमारे २०० वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था केली. तसेच चहा, नाश्ता, भोजन आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. गेल्या दोन दिवसांपासून ही दिंडी बकोरी देवराई वनराई परिसरात मुक्कामी असून दररोज हरिपाठ, भजन, कीर्तन आणि सत्संगाच्या माध्यमातून परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
बकोरी देवराई वनराई प्रकल्पातील हिरवाई, निसर्गरम्य वातावरण आणि पावसामुळे निर्माण झालेले धबधबे पाहून वारकरी आनंदित झाले. अनेकांनी धबधब्यात स्नानाचा आनंद घेत या मुक्कामाबद्दल समाधान व्यक्त केले. दि. ९ जुलै २०२६ रोजी ही दिंडी पुण्याकडे प्रस्थान करणार असून, त्यापूर्वी सर्व वारकरी बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार असल्याची माहिती चंद्रकांत वारघडे यांनी दिली.
यावेळी चंद्रकांत वारघडे म्हणाले, “माझे वडील स्व. गोविंदराव वारघडे आणि आई स्व. कमल वारघडे हे नियमित पंढरीची वारी करत असत. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि जलसंधारणाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतल्यामुळे मला नियमित वारी करता येत नाही. मात्र प्रत्येक झाडात, प्रत्येक पशू-पक्ष्यात आणि निसर्गाच्या प्रत्येक कणात मला माऊली आणि पांडुरंगाचे दर्शन घडते. त्यांची सेवा करणे हीच माझ्यासाठी खरी वारी आहे.
आज पांडुरंगानेच या वारकऱ्यांना माझ्या दारी पाठवून त्यांच्या सेवेसाठी मला संधी दिली. वारकऱ्यांच्या रूपात मला माऊली आणि विठ्ठलाचेच दर्शन झाले. त्यांच्या सेवेत सहभागी होणे हे माझे परमभाग्य आहे. माझे आई-वडील हे सर्व पाहत असतील तर त्यांचा आत्मा निश्चितच आनंदी झाला असेल. ही सेवा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पुण्याई असल्याची भावना माझ्या मनात आहे.”
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





