कीर्तनातून संत विचारांचे शुद्धपणे प्रबोधन करावे : डॉ. उल्हासदादा पवार
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी, प्रतिनिधी : वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचारांचा वारसा जपणारा ज्ञानसमृद्ध संप्रदाय असून, समता, बंधुभाव आणि शिस्तीची मोठी परंपरा या संप्रदायाने जपली आहे. त्यामुळे कीर्तनाच्या माध्यमातून संत विचारांचे शुद्धपणे प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. उल्हासदादा पवार यांनी केले.
विश्वशांती केंद्र, आळंदी, माईर्स एमआयटी पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथे आयोजित १७ व्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पवार बोलत होते. ‘साहित्य निष्ठांची मांदियाळी’ या संतसाहित्य नांदी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
६९ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि माईर्स विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, बबनराव कुऱ्हाडे, आळंदी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सुजाता तापकीर, नगरसेविका पूजा घुंडरे आणि माईर्स एमआयटी संस्थेच्या महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. उल्हास पवार म्हणाले की, भाषा ही संस्कृतीची खरी वाहक आहे. आपली अभिजात लोकसंस्कृती टिकवायची असेल, तर मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. आज समाजात वितंडवाद वाढविण्याऐवजी संतसाहित्याच्या माध्यमातून सुसंवाद आणि परिसंवाद घडवून आणणे आवश्यक आहे.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, संतत्वाची साथ सोडल्यामुळेच समाजाचे नैतिक अधःपतन झाले आहे. दांभिकता आणि अंधश्रद्धा बाजूला सारून सर्वांनी संतांच्या विचारांच्या आधारे एकात्म महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संत परंपरेतून विश्वशांतीचा ध्यास घेणारे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे खरे पाईक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर म्हणाल्या की, संत ज्ञानेश्वरांच्या ‘भावार्थदीपिके’तील ओव्यांना हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीताचा साज चढवला, तर लतादीदींनी आपल्या स्वरातून त्या ओव्या घराघरांत पोहोचवल्या. माउलींच्या या पावन भूमीत डॉ. विश्वनाथ कराड यांनी निःस्वार्थ भावनेतून केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
प्रा. स्वाती कराड-चाटे म्हणाल्या की, मराठी भाषेचे संवर्धन करणे आणि पुढील पिढीला तिची ओळख करून देणे ही शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे. चांगल्या साहित्यातूनच समाज समृद्ध होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतसाहित्याचे विचार रुजविणे आवश्यक आहे. नांदी संमेलनाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माउलींच्या पावन भूमीत ‘तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे’ होणारी वाटचाल मराठी भाषेला अधिक बळकटी देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आणि कार्यवाह सुनील महाजन यांनी पुण्यात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आळंदीतील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करून निमंत्रण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले, तर डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





