मुसळधार पावसाचा पुणे-अहिल्यानगर महामार्गाला फटका; लोणीकंद परिसरात वाहतूक कोंडी!
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
थेऊर चौकात पावसाच्या पाण्याचे मोठे तळे; तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा, नागरिकांचे दोन ते तीन तास हाल
लोणीकंद, प्रतिनिधी : सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर लोणीकंद येथील थेऊर चौक ते आळंदी फाटा चौकादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. पावसाचे पाणी महामार्गावर आल्याने थेऊर चौकात पाण्याचे मोठे तळे साचले. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. या कोंडीचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांना बसला.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला. परिणामी, लोणीकंद ते केसनंद रोड, आळंदी चौक ते तुळापूर रोड तसेच नगरच्या दिशेकडून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्याचबरोबर वाघोलीकडून लोणीकंदच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही कोंडीचा सामना करावा लागला. या सर्व मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला.
शहरात नोकरीसाठी जाणारे नोकरदार, उद्योगधंद्यांसाठी प्रवास करणारे नागरिक तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांना या वाहतूक कोंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थी, प्रवासी बस, रुग्णवाहिका आणि इतर वाहनांचाही वाहतूक कोंडीत खोळंबा झाला. अनेक नागरिकांना आपल्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचता न आल्याने दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला.
सुमारे दोन ते तीन तास वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. पावसाचे पाणी महामार्गावर साचल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाल्याचे चित्र दिसून आले.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर महत्त्वाच्या चौकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. मुसळधार पावसाच्या काळात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महामार्गावरील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनचालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





